मुंबई – राज्यातल्या करोनाग्रस्तांच्या संख्येत आज १० ते ११ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ३१ वर गेला आहे. आज सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २६ होती मात्र आता आणखी पाचजणांचे रिपोर्ट सकारात्मक आल्याने महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली आहे. कोरोनाची लागण झाल्याचं आढळलेले हे पाचही रुग्ण पिंपरी चिंचवड येथील असून यापैकी ४ दुबईहून तर एकजण थायलंडहून आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीये. आज पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १५ झाली आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी ही संख्या १८ ते १९ च्या घरात होती. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या महाराष्ट्रासाठी व पुणेकरांसाठी निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. देशभरात करोनाचे ८५ पेक्षा जास्त रुग्ण असून एकट्या महाराष्ट्रात हा आकडा ३१ वर गेला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात मॉल्स, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलीयेत. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरामध्येच थांबा असं आवाहनही करण्यात आलंय. हे संकट टाळण्यासाठी खबरदारीच्या उपायांचा अवलंब करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.