नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी 9 झाली आहे. जवळपास 440 रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकेच्या सिएटलमध्येही यासंदर्भातील पहिले प्रकरण समोर आले आहे.
मात्र भारतात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मंगळवारी जगभरातून आलेल्या नऊ हजार 156 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांनी बुधवारी सांगितले की दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यासह सात विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यात असून त्यामध्ये कोणत्याही प्रवाशाच्या शरीरात कोणताही विषाणू आढळला नाही.
प्रीती सुदान पुढे म्हणाल्या की, चीनमधील भारतीय दूतावास नियमितपणे त्या देशातील संक्रमित रुग्णांच्या स्थितीविषयी आरोग्य मंत्रालयाला अद्ययावत माहिती देत आहे. चीनमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरस सोबत न्यूमोनियाच्या एकूण 440 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या विषाणूमुळे बुधवारपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दूतावासाने दिली आहे. चीनमधील 14 विभागात (तैवानसहित) ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपमंत्री ली बिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाव्हायरस श्वसन प्रणालीद्वारे संक्रमित होतो. त्यामुळे ‘विषाणूजन्य उत्परिवर्तन’ होऊन रोगाचा प्रसार वाढतो. दरम्यान, अमिरिकेत या विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे. अमेरिकेच्या सिएटलमध्ये यासंदर्भातील पहिले प्रकरण अमोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही बाब गांभीर्याने घेत आज बैठक आयोजित केली आहे.
अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यानी मंगळवारी सांगितले की, या विषाणूचा एक रुग्ण आढळला असून पीडित महिला 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे. हि महिला चीनच्या वुहान प्रांतातून अमेरिकेत आली आहे.