चीनमध्ये करोनाचा कहर अद्यापही सुरूच आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील शांघाय-बीजिंग या दोन मोठ्या शहरांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाच्या या निर्बंधामुळे शहरात एकच गोंधळ उडाला असून येथील नागरिकांनी निर्बंधास विरोध दर्शविला आहे. एवढेच नाही तर करोनाविरोधात चीनच्या झिरो कोविड धोरणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शांघायमध्ये सलग 6 आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. येथे करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शांघायच्या 16 पैकी चार जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये येथील नागरिकांना घराबाहेर जाण्यास तसेच वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांना होणारा विरोधही तीव्र झाला आहे. शांघायचे रहिवासी कोको वांग म्हणाले, हे तुरुंगसारखे आहे. आम्हाला करोनाला नाही तर निर्बंधाची भीती वाटते.
दरम्यान, बीजिंगमध्ये आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. येथील दक्षिण-पश्चिम भागात सर्व नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नाही तर वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय बीजिंगमधील इतर भागातील लोकांना घरून काम करण्यास (Work from home) सांगितले आहे. काही रेस्टॉरंट आणि सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर अनेक इमारती आणि उद्यानेही सील करण्यात आली आहेत.