जिनिव्हा :जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी ही माहिती दिली.
येत्या काही दिवसात या विषाणूमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. या आधी अश्या पद्धतीने साथीचा रोग पसरण्याचे प्रमाण आपण पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले.
त्यामुळे आता करोना विषाणूच्या साथीला जागतिक आपत्तीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आतापर्यंत 100 देशांमध्ये या रोगाचे रुग्ण सापडले आहेत. किमान सव्वा लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाचे गंभीर स्वरुप ओळखून वेळीच उपाय योजना करण्याचे आवाहन बऱ्याच देशांनी विशेष गांभीर्याने न घेतल्यामुळे या रोगाचे रुपांतर साथीच्या रोगामध्ये झाल्याचे तज्ञांकडून बोलले जात आहे.
मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या घोषणेच्या पार्श्वभुमीवर जगभरातील मोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युरोपमधून येणाऱ्या प्रवाशांवर पुढचे 30 दिवस निर्बंध लादण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध अमलात येतील, असेही ट्रम्प म्हणाले.
भारतात साथीच्या रोगाच्या नियंत्रणाचा कायदा लागू केला जाणार आहे. कारोना विषाणू संसर्गाच्या साथी विरोधात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी साथीचा रोग नियंत्रण कायदा 1997 चे कलम 2 लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांनी सागितले आहे.
यामुळे राज्यांनाही या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे सोयीस्कर होईल असेही ते म्हणाले.
काल झालेल्या मंत्रालय सचिव, संबंधितमंत्रालय, लष्कराचे प्रतिनिधी तसचे भारत – तिबेट सीमा पोलीस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरीया, जपान, इटली, थायलंड, सिंगापूर, इराण, मलेशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी मधून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस स्वनिरिक्षणात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असून अशा लोकांच्या आस्थापनांना त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती आरोग्य मंत्रालयाने केली आहे.