करोना व्हायरस, ‘तो’ आवाज, आणि…!!!

करोनाविषाणूच्या प्रादुर्भावाने जगभर पसरलेल्या कोव्हिड-19 च्या महामारीतून आता आपण बाहेर येत आहोत. मात्र या महामारीच्या पहिल्या टप्प्यात आणि अत्यंत कडक लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य माणसाची मानसिक स्थिती कशी झाली होती, आणि त्यावर त्याने कशी सकारात्मकतेने मात केली, याचे प्रत्यकारी चित्रण दै. प्रभातचे लेखक अभिजित चंद्रा यांच्या या लेखात आपल्याला दिसून येईल.

अभिजित चंद्रा

त्या दिवशी उजाडताना, मी माझ्या गावच्या समुद्र किनाऱ्यावर एकटाच, उध्वस्त, घाबरलेल्या मनःस्थितीत उभा होतो. करोना व्हायरसच्या साथीमुळे माझ्या मनात भविष्याची प्रचंड चिंता दाटून आली होती. अजूनही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो सरसरून. न्यूज चॅनेल वरच्या त्या सततच्या भयंकर बातम्या, ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे गेलेले पेशंट्‌स आणि त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो, अर्थ व्यवस्थेची लागलेली वाट,ओस पडलेल्या बाजारपेठा, हॉटेलं, उदासवाणे, भयग्रस्त चेहरे, ह्या सगळ्या मुळे माझी मनःशांती रोज सतत भंगत होती. लसीकरणामुळे आता कुठे बाजारपेठेमध्ये थोडीशी धुगधुगी येऊ लागली होती. पण तशातच अफगाणिस्तान सारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मन परत चिंताग्रस्त होत होते. जगावर आलेले महायुद्धाचे सावट घाबरवून टाकत होते. एका संकटातून अजून पुरती सुटका देखील झाली नव्हती तर लगेच पुढचे संकट दारात उभे! ह्या नव्या संकटाचे संभाव्य दुष्परिणाम आधीच्या संकटाएवढेच भीषण !

माझ्या मनात सतत प्रश्न घोंघावत होते. हे दुःस्वप्न कधी संपणार आहे कि नाही? अर्थव्यवस्था कधी पुर्वीसारखी उभी राहणार आहे कि नाही? माझे रोजचे, आठवड्याचे, महिन्याचे , वार्षिक उत्पन्न कधी पूर्वीसारखे होणारेय कि नाही? सध्या तर माझा व्यवसाय, माझं धंदा पूर्ण कोलमडलाय, हातातून जाताना दिसतोय. अथक कष्टांनीं बांधलेले माझे हॉटेल, माझे घर, माझे राहील कि विकावे लागेल मला? माझ्या मुलाबाळांना, माझ्या कुटुंबाला खायला मिळेल का नाही? काय करू मी? कसा सगळा गाडा ओढू? माझ्या सर्व प्लॅन्सचे काय? माझ्या सर्व स्वप्नांचे काय? माझ्या सर्व जबाबदाऱ्यांचे काय? मुलांची शिक्षणे, आई वडिलांचे म्हातारपण, आम्ही ठरवले सर्व प्रवास, ट्रिप्स, आमचे स्वतःचे म्हातारपण, आमची बचत, आमची गुंतवणूक; अर्थव्यवस्था जर लवकर मूळ पदावर आली नाही तर मी हे सगळे कसे काय सांभाळणार आहे?

एवढ्यात मागून आल्यासारखा, एक सौम्य पण भरदार आवाज आला, ” तू काळजी करू नकोस “. मी पटकन मागे वळून बघितले पण तिथे कोणीच नव्हते. बीच वर त्यावेळी फक्त दोन माणसे होती, तीसुद्धा लांबवर. मग कोण बोलले? कोण बोललं? कुठे आहात तुम्ही? मी म्हणलो. आवाज आला ” मी सगळीकडेच आहे पण आत्ता मी तुझ्याच आतून बोलतोय. मला माहित आहे तू घोर चिंतेत आहेस. क्षणभर तुझ्या पायाशी बघ.

मी खाली बघितले. ओल्या वाळूवरती अगदी छोटे किडे इकडेतिकडे पळत होते. तो आवाज परत म्हणला ” ते जे किडे दिसतायत ना तुला, ते समुद्राच्या लाटांमधून त्यांचे अन्न मिळवतात. लाटांवर तरंगत येणारे छोटे अन्नकण हे किडे पकडतात. ते अन्नकण घेऊन ते धावत वाळूतल्या आपल्या छोट्या छोट्या बिळांमध्ये जातात आणि आपल्या छोट्याश्‍या कुटुंबाला ते खायला घालून व स्वतः खाऊन ते परत पाण्याकडे येतात. ह्या दरम्यान ती लाट परत गेलेली असते. ते दुसरी लाट परत येण्याची शांतपणे वाट बघत बसतात. त्त्यांच्या साध्या मनाला पूर्ण खात्री असते कि दुसरी लाट येईलच. त्यांना अजिबात काळजी किंवा चिंता नसते. आणि, तरंगणारे अन्नकण घेऊन दुसरी लाट खरच येतेसुद्धा. किडे परत अन्नकण गोळा करतात आणि धावत आपल्या बिळांकडे जातात. हे चक्र अव्याहतपणे चालूच राहते. मी हे जग तुम्हा सर्व प्राणिमात्रांसाठी असेच बनवले आहे, मग ते किडे असोत , प्राणी असोत किंवा सर्वात प्रगत मेंदूचे मानव असोत.

तो आवाज अतिशय शांत आणि धीर देणारा होता. मी गप्प होतो, थोडासा घाबरलोही होतो, पण तरीही शांतपणे पुढे ऐकत राहिलो.
तो आवाज पुढे म्हणला ” व्हायरसचा आणि अर्थव्यवस्थेपुढचा धोका तर खराच आहे. त्याला पर्याय नाहीये. पण त्याबद्दलची तुझी भीती हि फक्त तुझी वैचारिक प्रक्रिया आहे. तिला पर्याय आहे. ह्या कठीण काळामध्ये तू सतत ह्या किड्यांना लक्षात ठेवावेस आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यावीस. कारण सध्या मीच तुझ्या अन्नदात्या अर्थव्यवस्थेची लाट तुझ्यापासून लांब नेली आहे. सध्या तु ह्या अर्थव्यवस्थेमधील तुझ्या जागेवर शांतपणे उभा राहा आणि रोज जे काही शक्‍य आहे ते काम कर. माध्यमे आणि सामाजिक माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांकडे जेवढे आवश्‍यक तेवढेच लक्ष दे. तुझी जगाची माहिती जेवढी आवश्‍यक आहे तेवढीच अद्ययावत असू दे.

जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक क्षणी काय चालले आहे ते माहिती असण्याची तुला खरेच काही आवश्‍यकता नाही. तुझ्या शासनाने सांगितलेली सर्व आरोग्यविषयक सावधानी जरूर बाळग. तुझ्या सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळच. मीच त्यांना ते सर्व करायला सांगितले आहे. ह्या सर्व मर्यादांमध्ये राहून तू तुझे सर्वोत्तम काम करत राहा. तू आणि पृथ्वीवरचे इतर करोड लोक अशा पद्धतीने शांतपणे आपापली कामे करत रहाल तर ही अर्थव्यवस्था नक्कीच परत उदयाला येईल. ही लाट जी तुमच्यापासून लांब आत गेली आहे ती जोरात परतून येण्यासाठीच गेलीय.

शेवटी तो आवाज म्हणाला ” तू काळजी करू नकोस. हे माझे जग आहे. त्याची काळजी मला घ्यायलाच हवी ना?”

– अभिजीत चंद्रा
(करोना व्हायरस साथीनंतर)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.