बाधितांची संख्या 2 लाखांवर
पॅरिस : जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोना विषाणूची बाधा झालेल्यांच्या संख्येने बुधवारी 2 लाखांचा आकडा ओलांडला. त्याशिवाय, त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 आजाराने जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 8 हजारच्या पलिकडे पोहचली आहे.
मागील वर्षीच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये सर्वप्रथम चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूची जगभरात 2 लाख 5 हजार 642 जणांना लागण झाली आहे. करोना संसर्गामुळे जगभरात 8 हजार 272 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात चीनमधील सर्वांधिक 3 हजार 237 जणांचा समावेश आहे.
चीनमधील मोठ्या जीवितहानीमुळे आशियात 3 हजार 384 मृतांची नोंद झाली. मात्र, युरोपने जीवितहानीबाबत (3 हजार 422 मृत्यू) आशियाला मागे टाकले. चीनपाठोपाठ इटलीमध्ये 2 हजार 503 जण मृत्युमुखी पडले. तर इराण आणि स्पेनमध्ये अनुक्रमे 1 हजार 135 आणि 623 मृतांची नोंद झाली. करोनाचा फैलाव ध्यानात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जागतिक साथ जाहीर केली आहे.