करोना बाधितांना पूर्व हवेलीत मिळेना बेड

शंभरपेक्षा अधिक रुग्ण, संपर्कातील नागरिक वेटिंगवर

लोणी काळभोर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 100 पेक्षा अधिक जणांना मागील तीन दिवसांपासून उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने, रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, आरोग्य विभागाने 10 दिवसांपूर्वी हवेली तालुक्‍यातील विविध 12 खासगी रुग्णालयातील 1700 पेक्षा अधिक बेड अधिगृहीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, येथील एकाही खासगी रुग्णालयाने करोनाबाधित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले नसल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे.

करोनाबाधित रुग्णाला एकीकडे उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही. दुसऱ्या बाजूला करोना पॉझिटिव्ह असल्याने घरीही थांबता येत नाही. यामुळे बाधित व नातेवाइकांची दुहेरी कुचंबणा होत आहे. त्यातच खासगी रुग्णालयात उपचाराचे पैसे देण्याची तयारी दाखवूनही, बेड शिल्लक नसल्याचे सांगत उपचार करण्यास नकार मिळत आहे. यामुळे रुग्णांना व रुग्णांच्या जवळच्या नातेवाइकांना नाईलाजास्तव उपचाराविना घरीच रहावे लागत असल्याची गंभीर बाब मागील तीन दिवसांत पुढे आली आहे.

पूर्व हवेलीमधील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन, प्रशासनाने 10 दिवसांपूर्वी काही खासगी रुग्णालयातील 80 टक्‍के बेड करोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर अद्यापही एकाही रुग्णालयाने आरोग्य विभागाच्या ताब्यात बेड दिलेले नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. खासगी रुग्णालयातील बेड पुढील एक दोन दिवसांत मिळतील अशी अपेक्षा आहे.

जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व शल्यचिकीत्सक अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने वरील परीस्थिती निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. याबाबत पालकमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे. पुढील 24 तासांत परीस्थितीत कसा फरक पडेल, याकडे लक्ष देणार आहे.
-डॉ. अमोल कोल्हे, खासदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.