नवी दिल्ली – कोरोना लस कधी येणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना लस उपलब्ध होणार अशी माहिती कोरोना लस उत्पादन करणाऱी मोठी कंपनी सीरम इंस्टीट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आता आनंदाची बातमी समोर आली असून नोव्हेंबर मध्येच कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीने तयार केलेली लस नोव्हेंबर मध्ये मिळण्याची शक्यता आहे. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटची देखील भागीदारी आहे.
सध्या या लशीचं ट्रायल सुरू आहे. ट्रायलमध्ये लशीचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. तरूणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही या लशीमुळे मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही लस देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अॅंटीबाॅडी आणि टी-सेलची निर्मिती झाली आहे. वृद्धांवर या लशीचा दुष्परिणामही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लंडन येथील रूग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे, असे वृत्त द सनच्या बातमीचा हवाला देत राॅयटर्सने दिले आहे.