वुहान : जगभरात करोना लसीची वाट पाहण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात करोनाची लस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी चीनवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना चीनने करोना लस पुरवली आहे,असा दावा अमेरिकेच्या विश्लेषकांनी केला आहे.
वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय थिंक टँक केंद्रांतील दक्षिण कोरियाचे अभ्यासक हॅरी कझिअनीस यांनी हा दावा केला आहे. चीनने किम जोंग उन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रायोगिक तत्वावर असलेली करोनाची लस चीनने किम जोंग उन व त्यांच्या कुटुबीयांना पुरवल्याचा दावा हॅरी यांनी केला आहे.
किम जोंग उन यांना पुरवण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे का, याबद्दल माहिती कळालेली नाही. त्याचबरोबर ही लस कोणत्या कंपनीने पुरवली ही माहितीही मिळू शकली नाही, असेही हॅरी यांनी म्हटले आहे. “किम जोंग उन आणि त्यांचे कुटुंब, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या व राजकीय वर्तुळात सक्रिय असणाऱ्या इतर वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. मागील दोन तीन आठवड्यात हे लसीकरण करण्यात आलं असून, चीन सरकारनं ही लस पुरवली,” असं हॅरी यांनी १९ फोर्टी फाईव्हसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
अमेरिकेतील वैद्यकीय शास्त्रज्ञ पीटर जे. होटेझ यांनी यांनी असं म्हटलंय की, तीन चिनी कंपन्यांनी करोना लस विकसित केली आहे. सिनोव्हा बायोटेक लि. कॅनसिन्होबायो आणि सिनोफार्म ग्रुप यां कंपन्यांचा यात समावेश आहे, असे पीट यांनी सांगितले.