लखनौ – देशवासीयांना करोना लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तथापि लोकांनी करोना नियंत्रणासाठीच्या निर्बंधांच्या बाबतीत अजिबात ढिलाई दाखवता कामा नये असेही त्यांनी म्हटले आहे.
आग्रा मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या भाषणाच्या शेवटी याविषयाचा उल्लेख करून ते म्हणाले की गेले बरेच दिवस देशातील नागरीक करोना विरुद्धाच्या लसीची प्रतीक्षा करीत आहेत.
या संबंधात मी गेले काही दिवस वैज्ञानिकांशी बोलत आहे. त्यांच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली आहे की ही लस मिळण्यासाठी आता आपल्याला फार काळ वाट पहावी लागणार नाही. ही लस आता उपलब्ध होणार असली तरी त्यातून खूष होऊन लोकांनी करोनाविषयक निर्बंधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दोन व्यक्तींमधील अंतर आणि मास्क या बाबींकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाहीं असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला.