पुणे – सीरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्यानं कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात आहे. देशात परवानगी मिळवलेली ही पहिली लस आहे. आता सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया लवकरच करोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत.
यंदाच्या वर्षात जून महिन्यात सीरम करोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्वट करून दिली आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास ती देशातील तिसरी करोना लस ठरेल. ‘सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,’ पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Our partnership for a COVID-19 vaccine with @Novavax has also published excellent efficacy results. We have also applied to start trials in India. Hope to launch #COVOVAX by June 2021!
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 30, 2021
सध्याच्या घडीला पुणेस्थित सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसींचा वापर देशात सुरू आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय आहे. तर कोविशील्ड लसीसाठीचं संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं केलं आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशील्ड लसीचं उत्पादन करत आहे.