Corona Vaccine: शेवटच्या ‘ट्रायल’साठी सदस्यांची नोंदणी पूर्ण

नवी दिल्ली – पहिल्या स्वदेशी लशीचे तिसऱ्या आणि शेवटच्या ट्रायलसाठी सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कोव्हॅक्‍सिनच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच लशीबाबत कंपनीने मोठी माहिती दिली आहे.

भारत बायोटेकची कोव्हॅक्‍सिन म्हणजेच बीबीव्ही 152 ही लस. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीने यापूर्वीच जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोव्हॅक्‍सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचे दिसून आले आहे.

तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आणि ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम प्रसिद्ध करण्यात आला होता. ही लस यूकेत आढळलेल्या नव्या करोना व्हायरसविरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीने दिली आहे.

दरम्यान, देशात 13-14 जानेवारीपासून करोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राझेनकाच्या मदतीने तयार केलेली कोव्हिशिल्ड ही लस प्राधान्याने दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तर कोव्हॅक्‍सिन ही लस बॅकअप म्हणून असेल. ही लस करोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात प्रभावी आहे. त्यामुळे या नव्या करोना उद्रेक झाला किंवा गरज पडली तर कोव्हॅक्‍सिन लस दिली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.