‘डेल्टा व्हेरियंट’वर करोना लस प्रभावी नाही ? तज्ज्ञ काय म्हणतात…

जिनेव्हा – करोनाच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने चिंतेची बातमी दिली आहे. करोनावर लस तयार करण्यात आली आहे व जगभरात लसीकरणाची मोहीमही सुरू आहे. मात्र करोनाचा डेल्टा प्लस नावाचा जो नवा प्रकार आहे, त्यावर लस उपयुक्त ठरत नसल्याचे दिसून येत असल्याचा दावा आरोग्य संघटनेच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

दरम्यान, भारतातील तज्ज्ञांनी मात्र याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. भारतात दिल्या जात असलेल्या लसी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा येथील तज्ज्ञांनी केला असून त्याचा डेटाही लवकरच दिला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

लसीकरणामुळे सुरक्षितता काही प्रमाणात वाढली आहे अन मृत्यूदरही आटोक्‍यात आला आहे. या जरी जमेच्या बाजू असल्या तरी करोनाचा विषाणू सातत्याने आपले स्वरूप बदलत असून तीच चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येते आहे.

या सततच्या बदलामुळे विषाणूचे जे सध्याचे स्वरूप आहे त्यावर लसीचा परिणाम होणार नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भविष्यात विषाणूत बदल होउच नये यासंदर्भात संशोधन केले जाणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे.

करोनाच्या सध्याच्या डेल्टा या व्हेरिंटमुळेच भारतात दुसऱ्या लाटेत मोठी हानी झाली होती. आता या व्हेरियंटमध्येही बदल होत असून नवा डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळून येतो आहे. या नव्या व्हेरियंटचेही काही रूग्ण भारतात व महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

या नव्या विषाणूचे महाराष्ट्रातच 21 रूग्ण सापडले आहेत. त्यातील 9 रत्नागिरी जिल्ह्यात, 7 जळगाव जिल्ह्यात, मुंबईत 2 तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक रूग्ण डेल्टा प्लसचे आढळून आल्याची माहिती देण्यात आली आहे. केरळमध्येही त्याचे तीन रूग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशातही काही रूग्ण आढळल्याची बातमी आहे.

सध्या हा आकडा अत्यंत लहान आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत तो वाढता कामा नये अशी आमची इच्छा असल्यामुळे संबंधित राज्यांना ऍडव्हायजरी पाठवण्यात आली असल्याचे लसीबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. व्हि. के. पॉल यांनी सांगितले.

डेल्टा व्हेरियंटचा उगम 80 देशांत झाला असून आता भारतासह ब्रिटन, पोर्तुगाल, जपान, पोलंड, रशिया आणि चीनमध्येही डेल्टा प्लस आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारतात दिल्या जात असलेल्या दोन्ही लसी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचे आढळून आले असल्याचे मात्र त्यांनी नमूद केले. त्यांची ही भूमिका आरोग्य संघटनेच्या मताशी काहीशी विसंगत आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, डेल्टा प्लसच्या संदर्भातील डाटा अद्याप आलेला नसून तो लवकरच शेअर केला जाईल. भारतातील लसी त्यावर प्रभावी आहेत मात्र किती प्रभावी आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती माहिती लवकरच दिली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.