करोना लसीविषयी लगेच शाश्‍वती नाही; अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला इशारा

इतर मार्गांनी नियंत्रण मिळवणे शक्‍य

वॉशिंग्टन: जगभरात करोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व देशांमध्ये चिंता व्यक्‍त केली जात आहे. नोव्हेंबरमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोनाचे विषाणू जगभरात पोहोचले आहे. यामुळे अनेक देशांतील आर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच त्यावर औषधी शौधण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

मात्र, करोनावर लवकर लस मिळण्याची शक्‍यता मावळत चालली आहे. नजीकच्या काळात करोनाची लस मिळेलचे याची शाश्‍वती नाही, असे कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञ विलियम हेसलटाइन यांनी म्हटले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाला आवर घालण्यासाठी सध्या त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने याविषयी भूमिका मांडली आहे. विलियम हेसलटाइन म्हणाले, करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या काळात लस तयार होणे शक्‍य नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला.

करोनावर लस तयार करण्यात आली, तरी मी त्यावर अवलंबून राहणार नाही. यापूर्वीही करोना विषाणूच्या इतर प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या. पण, या लसी जेथून विषाणू शरीरात प्रवेश करतात, त्या नाकातील विशिष्ट त्वचेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाले आहे, अस हेसलटाइन यांनी सांगितले.

निवडणूक येईपर्यंत आपल्याकडे लस तयार होईल, असे सांगणाऱ्या राजकीय नेत्यांचे ऐकू नका. कदाचित आपल्याला ती लस मिळेलही, पण हा काही जिंकण्याचा प्रकार नाही. कारण आतापर्यंत आपण सार्स आणि मेर्सवर लस शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर पूर्णपणे सुरक्षा उपाय मिळू शकला नाही, असे ते म्हणाले.

लसीपेक्षाही इतर मार्गांनी करोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी नागरिकांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करायला हवे. तोंडाला मास्क लावायला हवा, हात धुवायला हवेत, सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं आणि स्वयं क्वारंटाइन आदी गोष्टी करायला हव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.