चेन्नई -निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या बिहारमध्ये मोफत करोना लसीचे आश्वासन दिल्यावरून भाजपला विरोधकांनी घेरले आहे. अशातच तामीळनाडूत प्रत्येकाला करोना लस मोफत देण्याची घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी केली आहे. करोना लस उपलब्ध झाल्यानंतर तामीळनाडूतील प्रत्येकाला ती दिली जाईल. त्यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकार उचलेल, असे अण्णाद्रमुकचे नेते असणाऱ्या पलानीस्वामी यांनी म्हटले आहे. तामीळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन पलानीस्वामी यांनी मोफत लसीची घोषणा केल्याची टीका त्यांच्यावरही होण्याची शक्यता आहे. मोफत लसीचा मुद्दा तापू लागल्याने त्याबाबत इतर राज्यांच्या सरकारांवरही दबाव येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्ये काय भूमिका घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.