नवी दिल्ली – करोना विषाणूवरील लस पुढील महिन्यात बालकांसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे प्रथमच याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची माहिती भाजप खासदारांच्या संसदीय बैठकीमध्ये दिल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी करोना लस सप्टेंबर महिन्यामध्ये बालकांसाठी उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. एम्स प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी याबाबत भाष्य करताना, ‘करोना लस बालकांना देण्याबाबतची परवानगी सप्टेंबरपर्यंत दिली जाऊ शकते.’ असं सांगितलं होत. भारतामध्ये झायडस कॅलिडाची बालकांसाठीची करोना लस चाचण्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे.
भारत बायोटेक देखील बालकांसाठीची करोना लस तयार करत असून या लसीच्या देखील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. जर चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले तर बालकांसाठीच्या करोना लसीस लवकरच मंजुरी मिळेल.
पटना व दिल्ली येथील एम्स रुग्णालयात बालकांसाठीच्या करोना लसीच्या चाचण्या सुरु आहेत. सध्या देशात भारत बायोटेकच्या कॅव्हॅक्सिन लसीला प्रौढांसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट देखील बालकांसाठी करोना लस ‘कोवाव्हॅक्स’ तयार करत आहे.
दरम्यान, जगभरामध्ये सध्या बालकांच्या लसीकरणासाठी अमेरिकन कंपनी फायजरची लस वापरण्यात येत आहे. फायजरने भारतात लस उपलब्ध करून देण्यासाठी अनेक अटी ठेवल्यामुळे याबाबत अद्याप विचार सुरु आहे. युरोपियन युनियनने १२ ते १७ वर्षांच्या बालकांसाठी मॉडर्न लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेस रोखण्यासाठी व शाळा पुन्हा सुरु करण्यापूर्वी बालकांचे लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे असल्याचं आरोग्य विषयक तज्ज्ञांनी म्हंटलं आहे. तसेच करोनाची तिसरी लाट बालकानासाठी घातक ठरू शकते अशा शक्यताही वर्तवण्यात आल्या आहेत.