मॉस्को – करोना विषाणूला प्रतिबंध करणारी लस सर्वात अगोदर शोधून काढल्याचा दावा रशियाने केला आहे. ही लस विकसित करण्यात यश आले असून उपयोगात आणण्यासाठीही तयार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
करोनाविरोधी लस कधी अस्तित्वात येईल याबाबत जगभरात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी लस मिळाल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही लस आपल्या कन्यांना दिलीही आहे.
या लसीच्या आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. करोना विषाणूला प्रतिबंध करू शकणारी रोगप्रतिकारक शक्ती या लसीमुळे विकसित होते, असा दावाही पुतीन यांनी केला आहे. मात्र या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष येण्यापूर्वी या लसीचा वापर करण्याबाबत देशातील आणि विदेशातील संशोधकांकडून सावधगिरीचा इशारा दिला जात आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष मिळण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. त्यासाठी हजारो उमेदवारांवर मानवी चाचणीचे निष्कर्षही अभ्यासावे लागतात. या लसीचे उलट परिणाम झाल्यास त्याचा फटका हजारो जणांना मिळू शकतो.
या लसीची योग्य चाचणी घेण्यात आली आहे आणि ती वापरण्यास सुरक्षित आहे यावर मंगळवारी झालेल्या सरकारी बैठकीत बोलताना पुतीन यांनी विशेष जोर दिला. या लसीच्या सर्व आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
आपल्या दोनपैकी एका कन्येने या लसीच्या मानवी चाचणीमध्ये भाग घेतला असून तिला या लसीचे दोन डोस देण्यात अले आहेत. या लसीचे इंजेक्शन दिल्यावर तिला थोडा ताप आला होता. पण हा ताप दुसऱ्याच दिवशी उतरला. दुसऱ्या डोसनंतरही तिला परत थोडा ताप आला होता. पण आता ती व्यवस्थित आहे, असे पुतीन म्हणाले.
ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. मात्र आपल्या मारिया आणि कतरिना या दोनपैकी कोणत्या कन्येला या लसीचा डोस दिला हे त्यांनी उघड केले नाही.
वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि इतर धोका पत्करून काम करणाऱ्यांना ही रोगप्रतिबंधक लस टोचण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे रशियन अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे. हे लसीकरण पुर्णपणे स्वेच्छेने होणार आहे.
या लसीचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादना सप्टेंबरमध्ये सुरू केले जाईल आणि व्यापक प्रमाणावरील लसीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली जाईल, असेही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.