कोरोना लस : मासिक पाळी आली असताना कोरोना लस घेऊ शकता का?

-त्या दिवसांत लस घेऊ नये ही अफवा -वैद्यकीय विभागाचे स्पष्टीकरण : सोशल मीडियावर व्हायरल होतेय खोटी माहिती

पिंपरी  -पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूला हरविण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. 1 मेपासून शहरातील 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. मात्र सोशल मीडियावर या बाबत एक अफवा फिरत आहे. तरूणी व महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवस आधी व नंतर लस घेऊ नये असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे. मात्र, हा संदेश फक्त अफवा पसरविणारा असून महिलांनी न घाबरता लस घ्यावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

याबाबत वैद्यकीय विभागाने एक व्हिजिओ प्रसारीत केला आहे. त्यामध्ये महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी या संदेशात केलेले दावे फेटाळून लावले आहे. या संदेशामध्ये मासिक पाळीच्या पाच दिवस आधी व पाच दिवस नंतर लस घेऊ नये असे आवाहन केले आहे. या दिवसांत महिलांची शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे या दिवसांत लस घेतल्यास त्याचा काहीही फायदा होणार नाही. तसेच महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागेल असे सांगण्यात आले आहे.

मात्र, असे काहीही नसून लस सुरक्षित असून 18 वर्षांवरील सर्वांसाठी ती फायदेशीर आहे. याबाबत बोलताना डॉ. डांगे म्हणाल्या, लस बनविणाऱ्या कंपन्यांनी असा कुठेही दावा केला नाही की मासिक पाळी असताना महिलांनी लस घेऊ नये. लसीमुळे तुमच्या शरीरात करोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती तयार होते. यापासून धोका काहीच नाही. अशा अफवांमुळे महिलांच्या मनामध्ये लसीबाबत शंका उपस्थित झाल्या असतील. मात्र घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा संदेश खोटा असून दिशाभूल करणारा आहे.

त्यामुळे 18 वर्षांवरील सर्व तरुणींनी लसीकरणासाठी पुढे यायचे आहे. तुम्ही कधीही करोनाची लस घेऊ शकता. याबाबत फक्त गर्भवती आणि स्तनदा मातांबाबत अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे त्यांनी लस घेण्याबाबत अजून शासनाने साशंकता व्यक्त केली आहे. मात्र इतर महिलांनी न घाबरता ही लस घ्यायची आहे. 1 मे पासून लस घेण्यासाठी कोविन ऍपवर आपली नावनोंदणी करायची आहे. करोनाला हरविण्यासाठी लस अंत्यत महत्त्वाची असून सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.