तीस कोटी भारतीयांना देणार लस

Madhuvan

नवी दिल्ली- भारतीयांना करोनाची लस देण्याच्या संदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार असून प्राधान्यक्रम काय असायला हवा याची यादी आता तयार केली जात असल्याचे वृत्त आहे.

करोनाच्या प्रसाराचा जास्त धोका असलेल्या भागासह आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी पोलीस यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 30 कोटी नागरिकांना 60 कोटी डोस दिले जाणार आहेत.

लसीच्या मंजुरीची आता प्रतीक्षा असून ती मिळाल्यानंतर लस देण्याचे काम सुरू केले जाणार आहे. लस देण्यासाठी चार श्रेणी तयार करण्यात आल्याचेही वृत्त एका माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

त्यानुसार आरोग्य क्षेत्राशी संबंधित 50 ते 70 लाख लोक, प्रत्यक्ष आघाडीवर जाऊन काम करणारे दोन कोटी नागरिक, पन्नासपेक्षा जास्त वय असणारे 26 लाख नागरिक आणि पन्नासपेक्षा कमी वय मात्र अन्य आजार असलेले नागरिक यांना सुरुवातीच्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.

लसीच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने एक योजना अगोदरच तयार केली आहे. केंद्र आणि राज्यांच्या संस्थांकडून त्यांनी काही माहिती मागवली आहे. डॉ. व्ही. के. पॉल या गटाचे नेतृत्व करत असून पहिल्या टप्प्यात देशातील 23 टक्के लोकसंख्येला लस दिली जाणार असल्याची माहिती गटाकडून कळते आहे.

प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेल्या कोणत्या क्षेत्रात किती कर्मचारी आहेत याची आकडेमोड करण्यात आली आहे. त्यानुसार या टप्प्यातील लसीकरणासाठी 60 कोटी डोसची आवश्‍यकता भासणार आहे. तसेच लस ठेवण्याची व्यवस्था, वाहतूक, तापमान आदी बाबींच्या अनुषंगानेही नियोजन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.