पवारांच्या बारामतीत शनिवारपासून…

बारामती (पुणे) – बारामती शहर व तालुक्‍यातील खासगी तसेच शासकीय सुमारे 3 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी (दि. 16) पासून करोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांसाठी ही गुडन्यूज ठरली आहे.

बारामती तालुक्‍यातील 1 हजार 278 शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 2 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवसाला 300 ते 400 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत बारामतीमधील करोनाचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

रूई येथील शासकीय महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभा करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

लस घेण्यापूर्वी सबंधित आरोग्य कर्मचाऱ्याची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, होमगार्ड, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे. तर पुढील तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपुढील व्यक्‍तींना तसेच मधुमेह व रक्‍तदाब असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्यवेळी सूचना देण्यात येती, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.

“लसीकरणाला सुरुवात झाली असली तरीदेखील सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ जाणार आहे. लसीकरण झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. एएसआय किट उपलब्ध असेल. सॅनिटाईझर व सोशल डिस्टंन्सचे नियम पाळणे गरजचे आहे.”
– डॉ. मनोज खोमणे,तालुका आरोग्य अधिकारी, बारामती

25 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण –
आरोग्य कर्मचाऱ्यांचा करोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये 1 व्हॅक्‍सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत 4 सहकारी असणार आहेत. त्यानुसार 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. 12) पुणे येथे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.