नवी दिल्ली – देशभरात सुरू होणाऱ्या करोना विरोधी लसीकरणात पहिल्या दिवशी तब्ब्ल तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 16 रोजी, शनिवारी करोनाविरोधी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 2,934 केंद्रांवर करोना लस स्वीकारणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज म्हटले आहे.
कोविड लसीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी विकसित केलेल्या “को-विन’ (कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क) ऍपचे याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनदेखील केले जाणार आहे.
देशभरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जास्तीत जास्त 100 लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन केलेल्या लसीकरण केंद्रांवर “को-विन’ ऍपच्या माध्यमातून नोंदणी झालेले आरोग्य कर्माचाऱ्यांना लस दिली जाईल.
यामध्ये डॉक्टर, परिचरिकांसह वैद्यकीय सहायक, सफाई कर्मचारी, रुग्णवहिकांचे चालक यांचाही समावेश असणार आहे. याशिवाय 50 वर्षांपुढील इतर व्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश या प्राधान्यक्रमामध्ये असणार आहे.
करोना विरोधी “कोविशिल्ड’ आणि “कोवॅक्सिन’ या लसींच्या 1.65 कोटी डोसच्या पूर्ण खरेदीची प्राथमिक प्रक्रिया सर्वच राज्यांमध्ये तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या आधारे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यात डोसच्या उपलब्धतेबाबत कोणताही भेदभाव होणार नाही.
करोना लसींचा हा प्राथमिक पुरवठा असणार आहे आगामी काळात हा लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू ठेवला जाणार आहे. त्यामुळे लसींचा पुरवठा कमी प्रमाणत होणार असल्याबद्दलची भीती अनाठायी आणि दुर्दैवी आहे, असे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
लसीकरण केंद्रांवर 10 टक्के डोस बाद होण्याची आणि प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रत्येक सत्रामध्ये 100 लसीकरण गृहित धरण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे. दरदिवशी लसीकरण सत्रांची संख्या वाढवण्याचा सल्लाही राज्यांना करण्यात आला आहे.
सरकारी अंदाजानुसार पहिल्यांदा 1 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि सुमारे 2 कोटी आघाडीवरील कर्मचाऱ्यांना करोना विरोधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्ती आणि त्यानंतर इतर आजार असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचे मूल्य केंद्र सरकारच्यावतीने दिले जाणार आहे.