कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यास आजपासून सुरुवात झाली. यापूर्वी डॉक्टर, नर्स आणि आशा वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले होते. मात्र आजपासून महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी अशा पाच हजार जणांना लसीकरण करण्यात येत आहे.
महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 10 सिद्धार्थ नगर इथं फक्त महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खास कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी केंद्र उघडण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
उदघाटनंतर लगेच निखील मोरे यांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पाठोपाठ महापालिकेचे फ्रंट वर्कर असणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही ही लस आज देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त निखील मोरे यांनी दिली. तसेच सोमवारपासून आणखी तीन लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.