नवी दिल्ली – करोना महामारीविरुद्धच्या लढाईत भारताने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणासाठी मुलांची नोंदणी करणे आवश्यक असून CoWin अॅपद्वारे मुलांची नोंदणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ आर एस शर्मा यांनी सांगितले की 1 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुले या लसीसाठी त्यांची नावे नोंदवू शकतील.
ख्रिसमसच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना एक मोठी भेट दिली होती. त्यांनी घोषणा केली की, 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना करोना लसीचा डोस देणे सुरू केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकची करोना लस (कोव्हॅक्सिन) मंजूर केली आहे.
दरम्यान, मुलांना कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना स्लॉट मिळेल. कोविन अॅपवरील स्लॉट दरम्यान, मुलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल. मुलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र करण्याची शक्यता आहे.