शिमला – हिमाचल प्रदेशातील सर्व प्रौढांचे करोना लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा शनिवारी राज्य सरकारने केला. त्यामुळे शंभर टक्के प्रौढांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणारे हिमाचल हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
हिमाचलात 18 वर्षांवरील 53 लाख 86 हजार 393 प्रौढ आहेत. त्या सर्वांना करोनालसींचे दोन्ही डोस देण्यात आल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. ऑगस्ट अखेरीस हिमाचलात सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसे करणारे ते पहिलेच राज्य ठरले होते.
आता आणखी महत्वाचा मान त्या राज्याने मिळवला आहे. दरम्यान, हिमाचलात शनिवारी 78 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 27 हजार 483 वर पोहचली. दिवसभरात त्या राज्यात एकही करोनामृत्यू झाला नाही. हिमाचलात आतापर्यंत 3 हजार 835 बाधित दगावले आहेत. त्या राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या 800 इतकी आहे.