corona vaccination | …तर आज देशात ही वेळ आलीच नसती – केंद्राच्या कोविड वर्किंग ग्रुप प्रमुखांचे ‘मोठे’ वक्तव्य

नवी दिल्ली ( corona vaccination India ) – संपूर्ण देशात सध्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे काम जवळपास थंडावले आहे. लसींचा अभाव असल्याने आता काही ठिकाणी नवीन लाभार्थ्यांची नोंदणीही थांबवण्यात आल्याची स्थिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने लसींच्या पुरेशा उपलब्धतेशिवाय 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणाच करायला नको होती. ( corona vaccination India )

त्या आधी ज्या वयोगटासाठीची घोषणा करण्यात आली होती त्यांच्यासाठी देशात पुरेसा लसींचा साठा आजही उपलब्ध आहे. पण नवीन गटांच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर हा साठा कमी पडू लागला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसींचा साठा अपुरा पडत आहे ही वस्तुस्थितीही डॉ. अरोरा यांनी मान्य केली. त्यांच्यासाठीच्या लसीकरणाची घोषणा टाळली असती तर आज ही वेळ आली नसती, असेही त्यांनी सूचित केले आहे.

 एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये लसीकरणाच्या संबंधात अग्रक्रम निश्‍चित करण्यात आला होता. त्यानुसार आधी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.  ( corona vaccination India )

त्यानंतर 60 वर्षांच्या लोकांच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आली आणि नंतरच्या काळात 45 वर्षांपुढील लोकांचे लसीकरण करण्यात आले. पण आता पुढील वयोगटासाठीची लस उपलब्ध नाही. अगदी विदेशात सुद्धा आज लस उपलब्ध नाही. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढूनसुद्धा त्यातून काही लाभ होण्याची शक्‍यता नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, देशभर कोविड लसीकरणाचा बट्ट्याबोळ झाला असला तरी आता ऑगस्ट ते डिसेंबर या अवधीत दोनशे कोटी डोस उपलब्ध होतील, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.