पुणे – राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व महापालिकांमध्ये शुक्रवारी लसीकरणाची “ड्राय रन’ होणार असून, या आधी झालेले चार जिल्हे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला वगळण्यात आले आहे. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी बुधवारी यासंदर्भात सर्व जिल्हे आणि महापालिकांमधील आरोग्य प्रमुखांना “व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सूचना दिल्या.
यावेळी राज्य लसीकरण अधिकारी आणि उपसंचालक डॉ. दिलीप पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिकांमधील आरोग्य प्रमुख उपस्थित होते.
पुण्यासह नागपूर, नंदूरबार, जालना या चार जिल्हयांमध्ये दि. 2 जानेवारी रोजी लसीकरणाची “ड्राय रन’ (रंगीत तालीम) घेण्यात आली होती. त्यामध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणमधील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा औंध रुग्णालय येथे लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता अशी “ड्राय रन’ सर्वच जिल्ह्याच्या आणि महापालिकांच्या स्तरावर घेण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या होत्या. “ड्राय रन’येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, मनुष्यबळाची जमवाजमव या विषयांवर बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यात आले.
येरवड्यातील स्व. राजीव गांधी रुग्णालयात “ड्राय रन’
येरवड्यातील स्व. राजीव गांधी रुग्णालयात लसीकरणाची “ड्राय रन’ होणार आहे. यामध्ये 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. लसीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया होणार असल्याचे महापालिकेच्या सहायक आरोग्य विभाग प्रमुख तथा लसीकरण कार्यक्रमप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. नियोजित बुथवर सुरक्षा रक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, लस टोचक अशा 5 जणांचा समावेश असणार आहे. हे मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. “ड्राय रन’ मध्ये प्रत्यक्षात लस टोचणे ही प्रक्रियावगळता इतर सर्व प्रक्रिया होतील.