वॉशिंग्टन – उद्यापासून अमेरिकेमध्ये कोविड -19 विरोधी मोठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. करोनामुळे जवळपास 3 लाख नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने फायझरच्या लसीला आपत्कालिन वापरासाठी परवानागी दिली आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
फायझर बायोएन्टेकच्या लसीचे ट्रक आज जवळपास 150 वितरण केंद्रांमध्ये दाखल होणार आहेत. मंगळवारी अतिरिक्त 425 ठिकाणी आणि उर्वरित 66 ठिकाणी बुधवारी लस उपलब्ध होणार आहे, असे ट्रम्प प्रशासनाचा लस विकास कार्यक्रम ऑपरेशन वार्प स्पीडचे जनरल गुस्ताव पर्ना यांनी सांगितले. सोमवारी ही लस येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी सर्वप्रथम ही लस घेतील आणि इतरांना लस देण्यास प्रारंभ करतील, असे पर्ना यांनी सांगितले.
लस वितण करण्याच्या दिवसाची तुलना पर्ना यांनी स्वातंत्र्यदिनाबरोबर, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेच्या विजयाबरोबर आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुरुवातीच्या दिवसाबरोबर केली आहे. परंतु अखेरीस विजय मिळविण्यासाठी अनेक महिने काम करणे, परिश्रम करणे, धैर्य व शक्ती आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.
या संपूर्ण अमेरिकेत लसीचा पुरवठा लवकर करण्यात यावा, यासाठीच्या व्यापक आरोग्य मोहिमेत फेडरल आणि राज्य सरकार, खासगी कंपन्या आणि आरोग्यसेवा कामगार यांचा समावेश आहे. सुरुवातीला, सुमारे 30 लाख डोस देशभरात वितरीत केले जाणे अपेक्षित आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस पुन्हा परत देण्यात येणार आहे. कोविड-19 पासून पूर्ण संरक्षणासाठी हा दुसरा डोसही आवाश्यक असणार आहे.
आरोग्यसेवा आणि नर्सिंग होममधील रहिवाशांना ही लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. मात्र तरिही पहिली लस नक्की कोणाला मिळेल, हे स्पष्ट झालेले नाही. त्याबद्दल आरोग्य अधिकारी निर्णय घेतील, असे पर्ना म्हणाले.