सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भरणे म्हणाले, सोलापुरकरांनी करोना लढ्यात साथ दिल्याने करोनाचे संकट परतवून लावण्यास मदत झाली. पुन्हा करोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रूग्ण वाढू लागले आहेत. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही. मात्र नागरिकांनी शासकीय आणि आरोग्य नियमाचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे. काही कडक निर्बंध घालणे जरूरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवा. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देऊन प्रभावीपणे राबवा. जे संसर्ग पसरवणारे आहेत त्यांच्याही चाचण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची तयारी करा. प्रत्येक ठिकाणी सुविधा देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.