वेल्हे,दि.१८(प्रतिनिधी)- वेल्ह्यात करोनाने चांगलेच हातपाय पसरायला सुरूवात केली आहे.वेल्ह्यातील एकाच गावातील सात जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत.तालुक्यातील करोनाची एकंदरीत वाढता आलेख पाहता चिंता व्यक्त करणारा ठरत आहे.शनिवार (दि.१८) रोजी वांजळे येथील सात जणांचा व सोंडे सर्फाला येथील एकाचा असे एकाच दिवशी तब्बल आठ व्यक्तींना करोनाची लागण झाल्याची माहीती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी दिली आहे.
वांजळे येथील दोघांना गुरूवारी करोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.त्यापैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.वांजळे या एकाच गावात १० रूग्ण झाले आहेत.सोंडे सर्फाला येथील लागण झालेली व्यक्ती वेल्ह्यातील पशू दवाखान्यातील कर्मचारी असून कोवीड सेंटर मध्ये काम करत होती. त्यांच्या संपर्कातील ३८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
वेल्हे तालुक्यात करोनाच्या रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून गुणाकार पद्धतीने संख्या वाढताना दिसत आहे. आतापर्यंत ३४ रूग्णांनी करोनावर मात केली असून सध्या २४ रूग्ण उपचार घेत आहेत.त्यामुळे तालुक्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ५८ झाली आहे.अर्ध्याशतकाला मागे टाकत शतकाकडे वाटचाल करणारा करोना ग्रस्तांचा आकडा प्रशासनासह वेल्हेकरांच्या चिंतेत भर टाकणारा आहे.