नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत संपूर्ण देशात कोविडचे 1 लाख 32 हजार 788 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 3207 इतकी आहे.
या नवीन आकडेवारीमुळे देशातील एकूण कोविड मृतांची संख्या आता 3 लाख 35 हजार 102 इतकी झाली आहे. करोना रुग्णांच्या संख्यात दिवसेंदिवस मोठी घट होत असल्याने सध्या सक्रिय बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असून आजच्या आकडेवारीनुसार सक्रिय बाधितांची संख्या 20 लाखांच्या खाली गेली आहे. ही संख्या 17 लाख 93 हजार 645 इतकी आहे.
पॉझिटीव्हीटीचा दर 8.21 टक्के इतका खाली आला असून देशाचा रिकव्हरी रेट आणखी सुधारून तो आता 92.48 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 1 हजार 875 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.