करोनाच्या दुसऱ्या लाटेचा युरोपात ‘कहर’; फ्रान्स ‘लॉकडाऊन’

वॉशिंग्टन  – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा युरोपात कहर सुरू झाला आहे. युरोपातल्या अनेक देशांमध्ये नव्याने निर्बंध लागू केले जायला लागले आहेत. पहिल्या लाटेमध्ये ज्या देशांमध्ये करोनाचे सर्वाधिक बळी होते त्या फ्रान्स, इटली, ब्रिटन, अमेरिका, स्पेन आदी देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या लक्षणीय रितीने वाढायला लागली आहे. संपूर्ण जगातील रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण युरोपात एका आठवड्यातच वाढले आहेत.

एकट्या अमेरिकेमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या एकाच दिवसात 1 लाख इतकी वाढल्याचे शुक्रवारी आढळून आले आहे. अमेरिकेतील एकूण करोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी 90 लाखांचा टप्पा ओलांडला. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यातील 80 लाख रुग्ण संख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर अखेरच्या 10 लाख रुग्णांची संख्या अखेरच्या 14 दिवसातच वाढली आहे.

गेल्या आठवड्यात 5 लाख आणि गुरुवारी एकाच दिवसात 90 हजार रुग्ण वाढले आहेत, असे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने केलेल्या सांख्यकी विश्‍लेषणात म्हटले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 29 हजार लोकांचा मृत्यू करोनाच्या संसर्गामुळे झाला आहे.

ब्रिटनमध्येही रुग्णांची संख्या वाढायला लागल्याने तज्ञांच्या सल्ल्याने सरकार पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशव्यापी निर्बंधांची एक यंत्रणा तयार केली असून हे निर्बंध सोमवारपासून लागू केले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये सध्या दिवसाला 20 हजार नवीन रुग्णांची नोंद होते आहे. पण खरी आकडेवारी यापेक्षाही अधिक असण्याचा अंदाज आहे. ब्रिटनमधील रुग्णांची एकूण संख्या 1 लाखाच्या जवळ पोहोचली आहे. तिथे 46 हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये नव्याने लॉकडाऊनची घोषणा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी केली आहे. त्यामुळे पॅरिस बाहेर जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. प्रवासासाठी नागरिकांना लेखी स्पष्टिकरण मागण्यात येऊ लागले आहे.

फ्रान्समधील रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता आणखी महिन्याभरात तेथील रुग्णांची संख्या तिपटीने वाढण्याचा धोका आहे. फ्रान्समध्ये डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागू असेल. त्यानंतर 15 दिवसांनी आढावा घेऊन निर्बंधांचा निर्णय घेतला जाईल.

स्पेनमध्ये पाच दिवसांपूर्वीच वैद्यकीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तिथे रात्रीची संचारबंदी लागू केली गेली आहे. पश्‍चिम युरोपात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव स्पेनमध्ये होता. तिथल्या रुग्णांची एकूण संख्या 10 लाख 46 हजाराच्यावर गेली असून 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्येही पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू शकेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. तर बेल्जियममध्येही सोमवारपासून नव्याने लॉकडाऊन लावला जाईल, असे पंतप्रधान अलेक्‍झांडर डी क्रू यांनी जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.