बंगलुरू – कर्नाटक सरकारने राज्यातीाल करोना निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथील केले असून उद्यापासून राज्यातील चित्रपट गृहेही सुरू करण्यात येत आहेत. तसेच रात्रीच्या संचार बंदीची मुदतही एक तासाने कमी करण्यात आली आहे.
26 जुलैपासून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठेही सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. ज्यांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची अनुमती देण्यात आली आहे. राज्यात गेल्या 27 एप्रिल पासून विद्यापीठे व महाविद्यालये बंद होती.
कर्नाटकात आता रात्रीची संचार बंदी रात्री दहा ते सकाळी पाच अशीच असणार आहे. म्हणजेच रात्री दहा पर्यंत सर्वांना वावरण्याची अनुमती दिली जाणार आहे.
राज्यातील करोना केसेसचे प्रमाण कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात काल एकूण 1869 नवीन करोना रूग्ण आढळून आले होते तर राज्यातील एकूण ऍक्टिव्ह केसेसचे प्रमाण 30 हजार 82 इतके आहे.