भंडारा – महाराष्ट्रासह देशावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा करोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या करोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे करोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.
भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या करोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सॅंपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही करोनाची लागण झाली नसल्याचे आढळून आले आहे.