नवी दिल्ली – करोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. यापासून बचावासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सल्ला एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. यामुळे त्यांचे जीवनच धोक्यात आले आहे.
एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत एका औषधाचे नाव सांगितले होते. मात्र या औषधाशी साम्य असणारे चुकीचे केमिकल एका जोडप्याने घेतले. या जोडप्याने करोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी माशांचे टॅंक साफ करण्याचे औषध घेतले. यामुळे नवऱ्याचा मृत्यू झाला. तर पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रम्प यांनी काय दिला होता सल्ला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होते की, कोरोना विषाणूच्या उपचारात अँटी-मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन खूप प्रभावी ठरू शकतो. याचा उपयोग कोरोना विषाणूच्या उपचारात करता येईल. मात्र, ट्रम्प यांच्या विधानाशी डॉक्टर सहमत नाहीत. डॉक्टरांच्या मते, या औषधाचा वापर सुरुवातीच्या अवस्थेत केला शकतो. आणि कोरोना विषाणूच्या उपचारात या वापराबद्दल आत्ताच काहीही बोलले जाऊ शकत नाही.
दरम्यान, ट्रम्प यांच्या सल्ल्यांनुसार, या जोडप्याने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनऐवजी क्लोरोक्वाइन फॉस्फेट नावाचे एक रसायन घेतले. मात्र, हे रसायन त्यांच्या जीवावर बेतले.