रुग्णांवर उपचार करताना डॉक्टराचा मृत्यू
पेईचिंग : कोरोना व्हायरसचा धोका सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनेच ही माहिती दिली आहे. वेनलियांग आणि इतर 8 जणांनी कोरोना नावाचा भंयकर विषाणू चीनमध्ये आल्याचे सर्वप्रथम सांगितले होते.
चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचे निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचे त्यांना आढळून आले.
गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.