मुंबई – मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना करोनाची लागण झाल्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात येणार आहे. दादर पश्चिमेकडील या रुग्णालयात प्रवेश मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुश्रुषामध्ये ऍडमिट असलेल्या सर्व रुग्णांना पुढील 48 तासांत डिस्चार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच नव्याने कुणालाही ऍडमिट न करण्यास सांगितले आहे. दोन नर्स करोना पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वच नर्सेसना रुग्णालयातच क्वारंटाईन करुन त्यांचीही चाचणी केली जाणार आहे. चाचणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना इतरत्र हलवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
दादरमध्ये आजच्या दिवसात करोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात शुश्रुषा हॉस्पिटलमधील दोन नर्स शिवाय 80 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता दादरमधील करोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.
वसई-विरारमध्ये पोलिसाला करोना
वसई-विरार परिसरात आज दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. वसई विरार परिसरात राहणाऱ्या एका 57 वर्षीय पुरुषाला, तर 52 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वसई विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसई विरारमध्ये राहणाऱ्या एका 57 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. ते अंधेरीतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर ते विरारमधील एका इमारतीत राहतात. सध्या त्यांच्यावर नालासोपारा पश्चिमेकडील रिध्दीविनायक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील चार जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.