संपर्कात आलेल्या आणखी 30 नर्स क्वारंटाइन
पुणे – शहरातील नामांकित रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या इन्चार्ज असलेल्या नर्सचाच करोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिच्या शिफ्टला काम करणाऱ्या आणखी 30 नर्सना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच अन्य दोन रुग्णालयांतील तिघांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
करोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्सला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. तिची तपासणी केली असता, तिला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नर्सचे वय 50 असून तिच्यावर रुबीमध्येच उपचार सुरू आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य इमारतीमध्ये “एच’ नावाचा वॉर्ड असून तेथे ही नर्स कार्यरत आहे. तसेच येथे आणखी इतर उपचारासाठी रुग्णदेखील ऍडमिट असून, त्यांचेदेखील नमुने तपासणीसाठी घेतल्याचे येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, नर्सलाच करोनाची बाधा झाल्याने येथील डॉक्टरही धास्तावले आहेत. मात्र, रुग्णालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ही नर्स रुग्णांच्या संपर्कात नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुबीचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले की, रुग्णालयातील सुमारे 30 नर्सेसला क्वारंटाइन केले आहे. त्यांच्यापैकी काही मुख्य नर्सच्या संपर्कात आल्याने त्यांच्या चाचणी केल्या जात आहेत. लागण झालेली नर्सचा थेट रुग्णांशी संपर्क नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
पुण्यात आणखी दोघींचा मृत्यू
मागील 24 तासांत शहरासह जिल्ह्यात करोनाचा एकही मृत्यू झाला नसल्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी (दि.12) दिवसभरात आणखी दोन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृतांची एकूण संख्या 31 वर जाऊन पोहचली आहे. रविवारी दिवसभरात झालेले दोन्ही मृत्यू ससून रुग्णालयातील आहे. त्यामध्ये परिसरात राहणाऱ्या 58 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. 9 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. तसेच सोमवार पेठेत राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेला दि. 5 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांचाही रविवारी दुपारी मृत्यू झाला. या दोन्ही महिलांना अन्य आजार होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.