ब्रिटनहून पुण्यात आलेल्या तरुणाला करोना

नव्या व्हायरसची लागण आहे का, हे दोन दिवसांत समजणार

पुणे – ब्रिटनहून आलेल्या एक तरुण करोना बाधित आढळला आहे; परंतु त्याला ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या “स्ट्रेन’ची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे.

गोखलेनगर भागात राहणारा हा 26 वर्षीय तरुण 15 दिवसांपूर्वी ब्रिटनहून पुण्यात आला. नियमाप्रमाणे त्याचे विलगीकरण करण्यात आले. मात्र त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु त्याला जी लागण झाली आहे ती ब्रिटनमधील नव्या व्हायरसची आहे का, याची तपासणी करणे आवश्‍यक आहे. ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

“या तरुणाला करोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे ब्रिटन व्हायरस असण्याची शक्‍यता आतातरी दिसून येत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याची “एनआयव्ही’मध्ये टेस्ट केली जाणार आहे,’ असे आरोग्य विभागाने सांगितले.

ब्रिटनमधून आलेल्या ज्या तरुणाला करोनाची बाधा झाली आहे, त्याच्यामध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव आहे का याची तपासणी केली जाणार आहे. “एनआयव्ही’ मध्ये त्याची “जिनोम सिक्वेन्सिंग’ ही टेस्ट होणार आहे. त्याचा अहवाल शनिवार-रविवारपर्यंत येईल, त्यानंतर या नव्या व्हायरसची लागण झाली आहे का, हे समजेल.
– डॉ. संजीव वावरे, सह आरोग्य प्रमुख, मनपा 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.