निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 24 जणांना करोना

नवी दिल्ली: दिल्लीत पश्‍चिम निजामुद्दीन भागातील एका धार्मिक स्थळात या महिन्यात झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांपैकी 24 जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

त्यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या कार्यक्रमात भाग घेतलेल्या 1033 जणांना विविध ठिकाणी हलवण्यात आले आहे. यातील सातशे जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून 335 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचीच वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

पश्‍चिम निजामुद्दीनमध्ये या कार्यक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या मौलानांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. तबलीग ई जमातचा हा कार्यक्रम होता. 1 ते 15 मार्च या अवधीत झालेल्या या कार्यक्रमात इंडोनेशिया, मलेशिया या देशातूनही काही नागरिक सहभागी झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.