पुणे – करोना विषाणूचा पुणे शहरात पहिला बाधित सापडल्यानंतर नायडू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, पंधरा दिवसांतच बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे विशेषतः अत्यवस्थ बाधितांना ससून रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि अपुरे बेड्स यामुळे राज्य शासनाकडून खासगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेतले.
यावेळी करोना झाल्यावर आता आपण नाही जगत अशीच भावना प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, डॉक्टर आणि परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना उपचार दिले, त्याचा सांभाळ केला त्यामुळे अनेक बाधितांना जीवनदान मिळाले. अन्य देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यासाठी शासकीयसह खासगी रुग्णालयांचे यश अधिक आहे.
बाधित शोधमोहिमेला बळकटी
ससूनमध्ये नव्याने बांधलेली 11 मजली इमारत अपुरी पडत असल्याने नवीन करोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या दीड महिन्यांत या रुग्णालयातील सर्व यंत्रणा कार्यान्वित केली. तब्बल सातशेहून अधिक बेडसंख्या तयार करण्यात आली. ससूनमध्ये आतापर्यंत 23 हजार 709 जणांना दाखल करण्यात आले. त्यातील 5 हजार 897 जण पॉझिटिव्ह, तर 17 हजार 812 संशयित होते. 1 हजार 932 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 1 हजार 720 जणांचा रुग्णालयात उपचार घेताना तर 212 जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
एकीकडे बाधितांना उपचार देणे, तर दुसरीकडे तत्काळ तपासणी करून अहवाल देणे ही जबाबदारी ससूनवर होती. आतापर्यंत 2 लाख 52 हजार 903 नमुने तपासणी करण्यात आली.