करोना ‘काळ’वर्ष : सांस्कृतिक कार्यक्रमांवर “पडदा’

लॉकडाऊन काळात सांस्कृतिक नगरी सुनीसुनी
पुणे –
सांस्कृतिक राजधानीतील कार्यक्रमांना करोनाचा अधिक फटका बसला. पुण्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर पडदा पडला आणि दररोज कार्यक्रमांची रेलचेल असणारी ही सांस्कृतिक नगरी सुनीसुनी झाली.

शहरातील बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आदी ठिकाणी दररोज नाटकांचे प्रयोग, नृत्य, संगीत आदी कलांचा अविष्कार असणारे कार्यक्रम होत असत. यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे शेकडो कलाकार मेहनत करतात. लवकरच उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असल्याने निर्मात्यांना नाटकांचे असंख्य प्रयोगाचे वेध लागले होते. मात्र, करोनाचा शहरात शिरकाव झाला आणि नेहमी तिसरी घंटा, उद्घोषणा, मान्यवरांची भाषणे, कला आणि टाळ्यांचा कडकडाटाने दुमदुमणारी सभागृह आणि रंगमंदिरांना टाळे लागले.

नोव्हेंबर अखेरीस राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर कलाविश्‍व पुन्हा सज्ज झाले. मात्र, लॉकडाऊनच्या सुमारे 7 महिन्यांच्या कालावधीत पडद्यावरील आणि पडद्यामागे असणाऱ्या कलाकारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेकांनी यादरम्यान जोड व्यवसाय करण्यास सुरुवात केली. शहरातील कार्यक्रम आणि शेकडो रसिकांची उपस्थिती हे समीकरण असते. मात्र, करोनामुळे गर्दीवरच बंधने असल्याने अनेक दशकांची परंपरा असणारी “सवाई’सारखे महोत्सव रद्द झाले. याशिवाय, चित्रपट क्षेत्रावरदेखील परिणाम झाला. राज्य सरकारने 50 टक्‍के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, अद्यापही रसिकांचा प्रतिसाद अत्यल्पच आहे.

…आणि “ई-कार्यक्रम’ पार पडले
करोनामुळे बहुतांश जण “टेक्‍नोसेव्ही’ झाले. नागरिकांनी प्रामुख्याने लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात “व्हर्च्युअल’चा पर्याय स्वीकारला. अनेक नामांकित संस्थांनी ऑनलाइन व्याख्याने घेतली. विविध सोशल मीडियाच्या पेजेसवर गाण्यांचे ऑनलाइन कार्यक्रम पार पडले. इतकेच नव्हे तर, गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांनी “ई-दर्शना’सह ऑनलाइन कार्यक्रमांचे दालन रसिकांसाठी खुले केले. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रमदेखील “व्हर्च्युअली’ झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.