करोना ‘काळ’वर्ष : “रेमडेसिविर’ची “लाख’मोलाने विक्री

उपचारातील अनिवार्य वापर आणि नंतर वारेमाप उपलब्धता

पुणे – करोना उपचारात गुणकारी ठरलेल्या “रेमडिसिविर’ इंजेक्‍शनचा सुरूवातीला सावध वापर झाला. रुग्ण अधिकच गंभीर झाल्यानंतर “रेमडिसिविर’चा वापर केला जात होता. मात्र, नंतर “रेमडिसिविर’चा वापर लागण झालेल्या रुग्णालाही केला जाऊ लागला. राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल साडेसहा लाख ” रेमडिसिविर’ या विषाणूविरोधी (अँटी व्हायरल) इंजेक्‍शनची विक्री झाली. त्यापैकी साडेतीन लाख व्हायल्सची विक्री एकट्या पुणे विभागात झाल्याचे “अन्न आणि औषध प्रशासना’च्या (एफडीए) पुणे विभागातर्फे सांगण्यात आले.

अत्यवस्थ करोनाबाधितांवरील उपचारादरम्यान “रेमडिसिविर’ या अँटी व्हायरल इंजेक्‍शनचे सहा डोस सलाइनमधून दिले जातात. रुग्णाची प्रकृती सुधारण्यात हे इंजेक्‍शन गुणकारी ठरत असल्याने त्याचा वापर आणि मागणी वाढली होती. सप्टेंबर महिन्यात पुण्यात 19 हजार व्हायल्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत उत्पादक कंपनीकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने बाजारात या औषधाचा तुटवडा वाढला होता. डॉक्‍टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन रुग्णांचे नातेवाईक “रेमडिसिविर’ मिळवण्यासाठी धावाधाव करताना पहायला मिळाले.

मागणी वाढल्यानंतर एफडीएने उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा करून हा पुरवठा सुरळीत केला. विक्रेत्यांच्या संघटनांशी समन्वय साधून 24 तास फार्मसी, जम्बो कोविड सेंटरमध्ये “रेमडिसिविर’ उपलब्ध करून दिले. याशिवाय रोज जेवढे डोस लागतात तेवढीच सोय रुग्णालयांनी करण्याला सुरूवात केली. त्याचा साठा करणे आणि “ब्लॅक’ने विकण्यावर कडक नजर ठेवण्यात आली.

साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी “प्रिस्क्रिप्शन’ असलेल्या व्यक्तींनाच “रेमडिसिविर’ची विक्री करण्याचे बंधन विक्रेत्यांवर घातले. त्याचबरोबर मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या आणि ऑक्‍सिजनवर असलेल्या करोना रुग्णांसाठीच “रेमडिसिविर’ चा वापर करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले, त्यानंतर हा विषय नियंत्रणात आला.

…असा झाला “रेमडिसिविर’चा वापर
संपूर्ण महाराष्ट्रात विक्री
6 लाख 56 हजार 539 व्हायल्स
पुणे विभागात विक्री
3 लाख 56 हजार व्हायल्स
पुण्यात विक्री
19 हजार व्हायल्स (सप्टेंबरमध्ये)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.