करोना ‘काळ’वर्ष : “जम्बो’चा निर्णय….पण, उशिरानेच!

पुणे – करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले परंतु व्यवस्थापनात या दोन्हीही संस्थांना खूपच घाई झाली. रुग्णसंख्येचा वाढता वेग आणि मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यांचा मेळ घालणे त्यांना कठीण जात होते. त्यातून बेड मॅनेजमेन्ट हा विषय या काळात कळीचा मुद्दा ठरत होता. त्यातूनच “जम्बो’ रुग्णालयाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न झाला. हा उशिरा घेतलेला निर्णय असला तरी सुरूवातीला तो अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला. नंतर तो यशस्वी झाला.

मार्च ते जूनपर्यंत केवळ बेड आणि मनुष्यबळ या सगळ्यांची तरतूद करण्यात दोन्ही प्रशासनांना तारेवरची कसरत करावी लागत होती. “जम्बो’ची संकल्पना मांडल्यानंतर सीओईपीच्या ग्राऊंडवर हे “जम्बो’ कोविड सेंटर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 800 बेड्‌सचे नियोजन करण्यात आले. त्यातील 600 बेड्‌स ऑक्‍सिजन आणि 200 व्हेन्टिलेटर बेड्‌स असे होते. राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता आणि महापालिकेत भाजपची त्यामुळे साहजिकच या सेंटरला निधी देण्याला महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी नकार दिला. त्यामुळे त्याचे खूप मोठे भांडवल विरोधकांनी केले, मात्र नंतर स्थायीने ते पैसे देण्याची तयारी दाखवली.

प्रचंड पाऊस, मैदानावर चिखल या सगळ्या गोष्टींमुळे “जम्बो’च्या उभारणीचा वेग मंदावला. 19 ऑगस्टला त्याचे उद्‌घाटन होणार होते, मात्र ते बांधूनच पूर्ण न झाल्याने ते रखडले; खूपच टीका झाल्यावर कसेबसे दि.23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाइन त्याचे औपचारिक उद्‌घाटन केले. त्यानंतरही त्याचे काम सुरूच राहिले. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा “जम्बो’ वादात सापडले.

मनुष्यबळाची अडचण
कोविड सेंटरचे इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे राहिले, तरी मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे तेथे रुग्ण दाखल करून घेणे शक्‍य झाले नाही. ज्या “लाइफलाइन’ कंपनीला हे काम दिले होते, ती कंपनी बोगस निघाली. त्यांनी महापालिकेला कित्येक दिवस मनुष्यबळ पुरवणार या नावाखाली अक्षरश: झुलवत ठेवले. त्यानंतर त्या कंपनीकडून काम काढून घेऊन अन्य कंपनीकडे ते सोपवण्यात आले. सुरूवातीला चारशे बेड्‌सचे नियोजन करण्यात आले आणि त्यानंतर पीएमआरडीएच्या मदतीने आणखी बेड्‌स वाढवण्यात आले. डॅशबोर्ड, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने याचे व्यवस्थापन सुरू झाले. लाखो रुपये पगार देऊन डॉक्‍टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती याठिकाणी करण्यात आली.

पुन्हा “जम्बो’ची गरज?
“जम्बो’चा कालावधी सहा महिन्यांसाठीचाच असल्याने ते 1 जानेवारीपासून बंद करण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ते सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्याची गरज लागल्यास पुन्हा 15 दिवसांत ते सुरू करू शकतो, अशी ग्वाही महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका प्रशासनाने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.