करोना काळ’वर्ष’ : हॉटेल व्यावसायिकांची अजूनही सावरण्याची धडपड

सततच्या निर्बंधांमुळे आर्थिक घडी बसवताना कसरत

पुणे -करोना, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायाला जबर आर्थिक फटका बसला आहे. तसेच, अद्यापही हा व्यवसाय यातून सावरलेला नाही. करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून राज्य, जिल्हा, पोलीस, महापलिका या सर्वच प्रशासनांकडून संसर्गापासून बचावाच्या दृष्टीने सतत निर्बंध घालण्यात आले. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही संकटांना सामोरे जावे लागत आहे. काही महिने हॉटेल बंद असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.

हॉटेलांचे भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे व विविध करांची रक्‍कम कशी भरायची, असा प्रश्‍नही उभा राहिला आहे. नोव्हेंबरनंतर हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास चालना मिळाली. सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करताना मोठी कसरत करावी लागली. मात्र, अजूनही ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नियमांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या विविध भागांत सुमारे 8 हजार 500 हॉटेल्स आहेत. त्यात 2 हजार 500 बार आहेत. 4 हजार छोटे हॉटेल्स आहेत. एका हॉटेलात किमान 30 कामगारांची आवश्‍यकता असते. हॉटेल व्यवसायाची दरमहा सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. करोनामुळे 30 टक्‍के हॉटेल अद्याप बंद आहेत. 25 टक्‍के कामगार गावी गेले असून ते पुन्हा परतलेच नाहीत. काही कामगार पुन्हा गावी जाण्याच्या तयारीत आहेत.

सध्या 11 वाजताच हॉटेल बंद करावी लागत असल्याने रात्री 9.30 वा.नंतर फारसे ग्राहक फिरकत नाहीत. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यवसायाला आणखी दणका बसेल, असेही व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून काही हॉटेल्स सुरू झाले. सतत निर्बंधाबाबतच्या नियमांमध्ये बदल होत असल्याने चालू-बंद अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. करोनामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मदत करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे. विविध करांची रक्‍कम भरण्यासाठी शासनाने सवलत देण्याची गरज आहे. शासनाने हॉटेल व्यावसायिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.