पुणे -करोना बाधितांची संख्या मे महिन्यापासून हळूहळू वाढत होती. परंतु, रुग्णवाढीचा वेग आणि बेडची उपलब्धता याचे प्रमाण विस्कळीत होत गेले आणि बेडच्या नियोजनाची महापालिकेची कसरत सुरू झाली. विश्वास संपादन करून प्रसंगी सक्तीने महापालिकेने खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेतले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढताना मोजक्याच सरकारी आणि खासगी रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार केले जात होते. आपल्याकडे करोनाचा रुग्ण दाखल आहे; याचा प्रसार झाला तर अन्य रुग्ण आपल्याकडे दाखल होणार नाहीत या भितीने अनेक रुग्णालय करोना रुग्ण नाकारत होते.
त्यावेळी “सॅनिटायझेशन’ आणि “डिस्टन्सिंग’ची फारशी माहिती रुग्णालयांना नसल्याने किंबहुना त्यांची तशी तयारी नसल्याने त्यांनी रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवातीला नकार दिला. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर या रुग्णालयांवर ताण वाढू लागला. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांनी बेड ताब्यात देण्याविषयीचे आदेश काढले, त्यानंतर महापालिकेने खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा करोनाबाधितांसाठी नियंत्रित करण्याची कारवाई सुरू केली.
खाटांची माहिती डॅशबोर्डवर न भरणाऱ्या खासगी रुग्णालयांना नोटीसा पाठवल्या. त्याचबरोबर रुग्णालयातील खाटांची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकारी नियुक्त केले. याशिवाय कोणत्याही वेळी बेडच्या व्यवस्थेसाठी येणाऱ्या कॉल्ससाठी वॉर रूममधून गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध करून दिल्या जात होत्या.