करोना काळ’वर्ष’: …आणि रुग्णसेवेसाठी रेल्वे धावली

श्रमिकांना मूळगावी पोहोचवण्याची जबाबदारी

पुणे   – अनेक शतके विना खंड सेवा देणाऱ्या रेल्वेच्या प्रवासी सेवेला करोनामुळे पहिल्यांदाच ब्रेक लागला. मात्र, यादरम्यान रेल्वेने ट्रॅक बदलत मालवाहतूक, श्रमिक विशेष वाहतुकीचा वेग वाढवला. इतकेच नव्हे तर, मास्क ते पीपीई किट अशा करोना प्रतिबंधक साहित्याची निर्मिती केली.

करोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या पाठोपाठ दररोज लाखो नागरिकांची वाहतूक करणारी आणि प्रामुख्याने नोकरदारांची लाईफलाईन असणारी रेल्वेसेवा 22 मार्च रोजी स्थगित केली. त्यानंतर परराज्यांतील कामगारांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर रेल्वेने 100 हून श्रमिक विशेष गाड्यांतून कामगारांना मूळगावी सोडले. यात प्रामुख्याने अधिकाऱ्यांसह देखभाल दुरुस्ती, इंजिनिअरिंग, कंट्रोलिंग आदी विभागांतील कर्मचारी 24 तास कार्यरत होते.

तर, जूननंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेची विशेष प्रवासी सेवा रुळावर येण्यास सुरुवात झाली. सध्या इंटरसिटीसह धावत असणाऱ्या सर्वच गाड्या “विशेष’ म्हणूनच सुरू आहेत. ऑक्‍टोबरमध्ये पुणे-लोणावळा मार्गावर लोकल सेवा आणि जानेवारीमध्ये पुणे-दौंड मार्गावर विशेष शटल सेवा सुरू झाली. मात्र अद्यापही सिंहगड, प्रगती, डेक्‍कन एक्‍स्प्रेस अद्यापही बंद आहेत.

मालवाहतुकीचा वेग वाढला
लॉकडाऊनच्या दरम्यान रेल्वेने आपला उत्पन्नाचा ट्रॅक मालवाहतुकीकडे वळवला होता. लॉकडाऊनमध्ये ट्रॅकवर गाड्यांची संख्या कमी असल्याने मालवाहतुकीचा वेग वाढला होता. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांत हजारो वॅगन्समधून काही दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. यात अन्नधान्य, खते, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा आदी पदार्थांसह ऑटोमोबाईल आदीचा समावेश होता. यासाठी रेल्वेने विशेष बिझनेस डेव्हलपमेंट युनिटदेखील सुरू केले. तर, या कालावधीत रेल्वेने अनेक रुग्णांची औषधे एका ठिकाणाहून दुसऱ्या शहरांत नेण्यासाठी मदत केली. याशिवाय, पोस्ट आणि रेल्वेने एकत्रित पार्सल सेवा सुरू केली.

वैद्यकीय क्षेत्राचा मार्ग विस्तारला
रेल्वे रुग्णालयांमध्ये करोना संशयितांच्या स्वॅब टेस्टची सुविधा केली होती. याशिवाय, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार केले. याशिवाय, रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने सॅनिटायझरची निर्मिती केली. रेल्वेचे आजी-माजी कर्मचारी, त्यांचे परिवारांत सुमारे 400 हून अधिक करोना संशयित होते. त्यापैकी सुमारे 200 हून अधिक पॉझिटिव्ह आले. तर, सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.