नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेस यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या बातम्यांमुळे संघटना अत्यंत चिंतेत आहे. कारण चीनने आपले शून्य कोविड धोरण मोठ्या प्रमाणात सोडले आहे, परिणामी मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत.
टेड्रोस म्हणाले की, यूएन एजन्सीला चीनमधील कोविड-19 च्या तीव्रतेबद्दल, विशेषत: रूग्णालयात आणि अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रूग्णांवर, जमिनीवरील परिस्थितीचे सर्वसमावेशक जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक माहिती आवश्यक आहे. टेड्रोस अधानोम गेब्रेयस म्हणाले की, चीनमध्ये गंभीर आजाराच्या वाढत्या प्रकरणांच्या संदर्भात WHO बदलत्या परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहे.
दरम्यान, कोरोनाने चीनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ना रुग्णालये उरली, ना औषधे उपलब्ध अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मशानभूमीत मृतदेहांसाठी जागा उरलेली नाही. त्याचवेळी सरकार कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी लपवत आहे. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा तातडीने निकाली काढण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. अधिकाऱ्यांनी तर म्हटले आहे की, सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे की मृतदेहांना मोजनेही कठीणं झाले आहे.
चीनमध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे, लाखो लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पण चीन आपली आकडेवारी सादर करत नाही ही दुसरी बाब आहे. देशात झिरो कोविड धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, चीनमधील कोरोनाबाबत तज्ज्ञाने दिलेला इशारा आणखीनच भयावह आहे. चिनी तज्ञाने हिवाळ्याच्या तीन महिन्यांत कोरोनाचे अधिक स्फोट झाल्याचे सांगितले आहे. पुढील तीन महिन्यांत कोरोनाच्या आणखी तीन लाटांचा इशारा देण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.