#Corona | टी-20 विश्‍वचषक स्पर्धाही संकटात

भारताऐवजी युएईत स्पर्धा घेण्यासाठी चाचपणी सुरू

नवी दिल्ली  – आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता भारतात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये हलवू शकते. स्पर्धा यूएईमध्ये झाली तरी स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयकडेच राहणार आहे. आयसीसीने सुरुवातीलाच करोना संकटात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्याबद्दल चिंता व्यक्‍त केली होती.

बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. या चर्चेत वर्ल्ड कप यूएईमध्ये आयोजित करण्यात यावा, याबाबत सहमती झाली. सुरुवातीला भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप 9 ठिकाणी खेळवायचा बीसीसीआयचा मानस होता. पण आयपीएल एका महिन्याच्या आत रद्द करावी लागली. भारत मागच्या 70 वर्षातल्या सगळ्यात खराब आरोग्य संकटातून जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जागतिक स्पर्धेचे आयोजन करणे सुरक्षित नाही, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.

भारतात सप्टेंबर महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे बीसीसीआय आयोजन करेल, पण वर्ल्ड कप मात्र यूएईमध्ये होऊ शकतो. यूएईमध्ये स्पर्धा आयोजित करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे शारजाह, दुबई आणि अबूधाबी अशा तीन मैदानावर स्पर्धा घेता येईल आणि यासाठी हवाई प्रवास करण्याची गरज नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच गेल्या वर्षी आयपीएलचे यशस्वीरित्या व्यवस्थापित केले होते. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यत सर्व खेळाडू एकाच बायोबबलमध्ये सुरक्षित होते. दुसरीकडे जर स्थिती सर्वसामान्य न झाल्यास पुढील 6 महिने कोणताही देश भारताचा दौरा करणार नाही. आणखी एक लाट आल्यास खेळाडू आणि त्यांचं कुटुंब आणखी सतर्क होईल. यामुळे बीसीसीआय स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करू शकते. यासंदर्भात जून महिन्यात आयसीसीची बैठक होणार असून यात वर्ल्ड कपबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.