शहरात अडीच लाख चाचण्या
पुणे – शहरातील तब्बल साडेपाच टक्के लोकसंख्येच्या आतापर्यंत करोना चाचण्या झाल्या आहेत. यातील 1 टक्के बाधित सापडले आहेत. शहरात आतापर्यंत तब्बल 2 लाख 41 हजार 418 चाचण्या झाल्या असून, प्रती दहा लाख व्यक्तींमागे हे प्रमाण तब्बल 54 हजार 534 आहे. तर महापालिकेने रॅपिड ऍन्टिजेन टेस्टची संख्या लक्षणीय वाढवली आहे.
शहरात करोनाचा पहिला बाधित सापडल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत या बाधितांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 90 टक्क्यांहून अधिक व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये दरदिवशी सुमारे 500 ते 700 चाचण्या केल्या जात होत्या. मेमध्ये या चाचण्यांची संख्या 1,500 पर्यंत नेण्यात आली. त्यानंतर जूनमध्ये चाचण्यांचा आकडा 2500 ते 3 हजारपर्यंत नेण्यात आला. मात्र, जुलैमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेने दरदिवशी आता चाचण्यांची संख्या साडेसहा हजारांपर्यंत वाढवली आहे. परिणामी, बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची तातडीने चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यात मदत होत आहे. आता चाचण्यांची संख्या दररोज साडेसात ते आठ हजारांपर्यंत नेण्यात येणार आहे.
15 ठिकाणी स्बॅब सेंटर
महापालिकेने चाचण्यांसाठी शहरात 15 ठिकाणी स्वॅब सेंटर उभारली आहेत. याशिवाय प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केले जात आहे. सुरुवातीला 500 आणि आता तीन हजारांपर्यंत या चाचण्या वाढवण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने 1 लाख किटची खरेदी केली असून, आणखी 1 लाख किट खरेदी केल्या जाणार आहेत.