करोना टेस्टचा अहवाल 45 मिनिटांत

 ससूनमध्ये तत्काळ कोविड तपासणी होणार

– सागर येवले

पुणे – ससून रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला आणि अत्यवस्थ रुग्णांची तत्काळ करोना तपासणी व्हावी, यासाठी “कोविड टेस्टिंग मशीन’ खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे फक्‍त 45 मिनिटांत करोनाचा टेस्टचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे बाधितांवर तातडीने उपचार शक्‍य होणार आहेत.

ससून रुग्णालयात करोना संसर्ग तपासणीसाठी सध्या “ऍबट’ कंपनीचे स्वयंचलित मशीन असून, त्यामध्ये साधारण आठ तासांत 94 स्वॅब तपासणी होतात. मात्र, अनेकदा अत्यवस्थ व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवून त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जातात. 94 स्वॅब येण्याची वाट न पाहता जेवढे उपलब्ध आहेत, तेवढे लावावे लागतात. नव्याने आलेले रिपोर्ट आठ ते दहा तासानेच तपासले जाऊ शकतात. त्यामुळे स्वॅब अहवाल येण्यास उशीर होऊ शकतो. त्याचा फटका अत्यवस्थ रुग्ण आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला बसतो. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने “सीबी नॅट’ कंपनीची मशीन खरेदीचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठला असून, दहा ते पंधरा दिवसांत ही मशीन येणे अपेक्षित आहे. या मशीनमध्ये एकाचवेळी 16 स्वॅब तपासणी केले जाऊ शकतात.

संभाव्य धोके टळणार
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेची करोना तपासणी आवश्‍यक आहे. पण, सध्या स्वॅब तपासणी संख्या वाढल्याने अहवाल येण्यास आठ ते बारा तास लागतात. अशावेळी महिलेला कळा सुरू झाल्यावर प्रसूतीशिवाय दुसरा पर्याय डॉक्‍टरांकडे नसतो. त्यात ती करोनाबाधित असल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आता अवघ्या 45 मिनिटांत अहवाल मिळेल आणि पुढील धोका टळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.